मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालासाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या ट्रेण्ड्समुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 227 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सुमारे 52.94 टक्के मतदान झाले होते.मतमोजणीच्या पहिल्याच तासात ठाकरे बंधूंनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली, तर भाजप आणि शिंदे गटानेही दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईच्या सत्तेचा किल्ला कोण जिंकणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पहिल्या तासातील (सकाळी 10.30 पर्यंत) आघाडीची स्थिती
शिवसेना (ठाकरे गट) – 12 जागांवर आघाडी
भाजप – 10 जागांवर आघाडी
शिवसेना (शिंदे गट) – 7 जागांवर आघाडी
मनसे – 6 जागांवर आघाडी
काँग्रेस – 5 जागांवर आघाडी
इतर – 3 जागांवर आघाडी
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. हा टप्पा कोण पार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक्झिट पोल काय सांगतो?
जनमतच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला 138 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला मिळून 62 जागा, काँग्रेस-वंचित आघाडीला 20, तर इतर पक्षांना 7 जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीतील सुरुवातीचे ट्रेण्ड्स या अंदाजांपेक्षा वेगळी चित्र दाखवत आहेत.
ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र
महायुतीला शह देण्यासाठी तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे यांनी युती करत निवडणूक लढवली. या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता.दुसरीकडे, ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली, तर काँग्रेस आणि वंचित आघाडीने युती केली.मतमोजणी जसजशी पुढे सरकते आहे, तसतसे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मुंबईच्या सत्तेचा फैसला नेमका कुणाच्या बाजूने जाणार, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.