पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काका–पुतण्याची राष्ट्रवादी एकत्र आली असली, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या एकीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसून, पुण्यात अजित पवार गटाला केवळ 7 तर शरद पवार गटाला 3 जागांवरच आघाडी मिळाल्याचे सध्याचे कल दर्शवतात.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने स्पष्ट आघाडी घेत सत्ता कायम राखण्याच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. 128 जागांच्या महापालिकेत भाजप 74 जागांवर आघाडीवर असून, एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला केवळ 41 जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेत भाजपची मुसंडी
पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप 90 जागांवर आघाडीवर असून, महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 82 चा बहुमताचा आकडा भाजपने ओलांडला आहे.
काँग्रेसचे खाते उघडले; प्रशांत जगतापांचा विजय
दरम्यान, राष्ट्रवादीच्या एकीला विरोध करत शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे पुण्यात काँग्रेसने खाते उघडले असून, आतापर्यंत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याची माहिती आहे.
प्रभाग क्रमांक 18-ड मधून निवडणूक लढवणाऱ्या प्रशांत जगताप यांनी भाजपचे उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा सुमारे 1800 मतांनी पराभव केला. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र असून, ते ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. अटीतटीच्या लढतीत जगताप यांनी बाजी मारत भाजपला धक्का दिला आहे.दरम्यान, याच प्रभागात प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप या सध्या पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.एकूणच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व स्पष्ट होत असताना, काका–पुतण्याच्या एकीला मात्र मोठा राजकीय धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.