मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप न झालेल्या असतानाच स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. 227 निवडून आलेले आणि 10 स्वीकृत असे एकूण 237 नगरसेवकांचे सभागृह पहिल्यांदाच अस्तित्वात येणार असून, या 10 स्वीकृत जागांसाठी सर्वच पक्षांत जोरदार लॉबिंग सुरू आहे.2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेत प्रथमच 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे.
पक्षनिहाय संभाव्य स्वीकृत नगरसेवक
निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपला सर्वाधिक 4 स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना (शिंदे गट) – 1,
शिवसेना (ठाकरे गट) – 2,
मनसेने पाठिंबा दिल्यास ठाकरे गटाला – 3,
तर अपक्षांचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेसलाही – 3 स्वीकृत नगरसेवक मिळू शकतात.दरम्यान, 10 नवीन सदस्य वाढल्याने महापालिका मुख्यालयातील सभागृहात आसनव्यवस्था कशी करायची, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय?
स्वीकृत नगरसेवक हे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विशेष सदस्य असतात. त्यांची थेट निवड जनतेतून होत नाही. प्रशासन, कायदा, आरोग्य, शिक्षण, अभियांत्रिकी, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना ही संधी दिली जाते.
नियुक्ती प्रक्रिया व अधिकार
स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती महापालिका आयुक्तांच्या शिफारशीवर, सभागृहाच्या संमतीने आणि महापौरांच्या शिफारशीनंतर राज्य सरकारकडून केली जाते.त्यांना मानधन, भत्ते आणि विकास निधी मिळतो. सभागृहातील चर्चेत सहभाग, सूचना मांडणे व विविध समित्यांमध्ये काम करण्याचा अधिकार असतो. मात्र, महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समितीच्या निवडणुकांत मतदानाचा अधिकार नसतो.
मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण
25 वर्षांची ठाकरे गटाची सत्ता उलथवून भाजप युतीने मुंबई महापालिकेत वर्चस्व मिळवले आहे. भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महापौरपद महायुतीकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल :
भाजप – 89
शिवसेना (ठाकरे गट) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एआयएमआयएम – 8
राष्ट्रवादी (अजित पवार) – 3
समाजवादी पार्टी – 2
राष्ट्रवादी (शरद पवार) – 1
एकूण – 227