उरण : पनवेल तालुक्यात सर्वांत जुने रयत शिक्षण संस्थेचे महात्मा ज्योतिबा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामुळे लाखो विद्यार्थी घडलेत. महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन मंगळवारी (ता. २०) मोठ्या उत्साहात करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या हस्ते झाले.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी १९८१ मध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा खेळाबाबत फार सुविधा नव्हत्या. त्या मानाने आता निश्चितच प्रगती आहे. मात्र कालानुरूप महाविद्यालयाची इमारत आणि सुसज्ज स्पोर्टस कॉम्प्लेक्स हवे. परेश ठाकूर यांच्यात लढाऊ वृत्ती हवी, त्यांनी सुंदर क्रीडा संकुलासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या महाविद्यालयाचा इतिहास उज्ज्वल आहे. त्यामुळे आता कालानुरूप चेहरामोहरा बदलायलाच हवा. यासाठी रामशेठ ठाकूर यांचेही योगदान महत्त्वपूर्ण असेल."
महात्मा ज्योतिबा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर म्हणाले, "विद्यार्थ्यांनी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत यश मिळवावे. स्पर्धा प्रचंड आहे, महाविद्यालयीन शिक्षण हे फक्त एखाद्या क्षेत्रात प्रवेशासाठी; परंतु खरी कसोटी त्यानंतर सुरू होते. त्यासाठी स्वतःचा फिटनेस महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळ व व्यायाम यांची सांगड घालावी. स्वतःला सतत तंदुरुस्त ठेवावे."
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर म्हणाले, "वार्षिक क्रीडा स्पर्धांत महाविद्यालयाच्या स्टाफलाही आम्ही संधी देतो. कारण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे. महेंद्रशेठ घरत यांच्याकडून फिटनेस शिका, कारण आजही ते नियमित व्यायाम करतात आणि क्रिकेटही खेळतात. आयुष्यात समयसूचकता हवी. आपल्या महाविद्यालयाच्या जडणघडणीत अनेक माजी विद्यार्थ्यांचे योगदान खूप मोठे आहे."
करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार म्हणाले, "मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. ज्यावेळी महाविद्यालयाच्या विकास कामाबाबत माझ्या सहीसाठी पत्र आले, तेव्हा मी अक्षरशः भारावून गेलो होतो. हे परमभाग्य मला लाभले. त्यामुळे रेल्वे ट्रॅक पुलाचे काम मार्गी लागेल, वाहतूक प्रश्न सुटेल. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी मला शक्य असेल ते मी करणारच."
यावेळी जिमखाना कमिटीच्या वतीने राज्यस्तरीय 'कुलाबा जीवनगौरव पुरस्कार' मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांचा आणि 'आगरी समाज भूषण पुरस्कार' मिळाल्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उपप्राचार्य डॉ आर. ए. पाटील, प्रा. डॉ. लक्ष्मण गवळी, प्रा. डॉ. आर. पी. म्हात्रे, सुनीता काटकर, ललिता अवचिते, अनंता जाधव, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, प्रवीण गायकर, यशवंत उलवेकर, संभाजी बडे, ममता चव्हाण, हर्षदा नाईक, एन. डी. गवंडी आदी उपस्थित होते.