पुणे : “भारत माता की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, “गणपती बाप्पा मोरया” अशा घोषणांनी, शाळेच्या मुलांनी शिवकाळातील वेशभुषा केलेले शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण आणि सासवडकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भरलेल्या वातावरणात ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची सासवड नगर परिषद परिसरात सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडी दाखवून या टप्प्याच शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सायकलपटूंशी संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याने नेहमीच खेळांना प्राधान्य दिले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याशिवाय खेळाडूंनाही आनंद आणि प्रेरणा मिळत नाही. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून स्पर्धेचे मार्ग अत्यंत दर्जेदार आहेत. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सायकलपटूंना विशेष ऊर्जा मिळत असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. केंद्र सरकार, राज्य शासन आणि संपूर्ण पुणे जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करीत असून बजाज, सिरम इन्स्टिट्यूट यांसारख्या नामांकित कंपन्या तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. सासवडकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.
‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची एकूण लांबी १३७.७ किलोमीटर असून हा टप्पा सासवड येथून सुरू होऊन सुपे, पानवडी घाट, काळदरी (बोरी फाटा), मांढर, माहूर, परींचे, हरणी, वाल्हे, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधरा, मुर्टी, मोरगाव, तरडोली, जळगाव क. प., कऱ्हावागज, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कन्हेरी, रुई रोड सावळ, वंजारवाडी मार्गे विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे संपन्न झाला. मार्गावरील प्रत्येक गावात नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्या, शिट्ट्या, घोषणाबाजी आणि विविध वाद्यांच्या निनादात सायकलपटूंना उत्साहाने प्रोत्साहन दिले. गावोगावी रस्ते सजविण्यात आले होते, चौकाचौकात ‘पुणे ग्रँड टूर’चे कटआऊट्स लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण मार्गावर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
आजच्या स्पर्धेतील क्षणचित्रे
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी सायकलपटूंशी संवाद साधला. सायकलींची पाहणी करत खेळाडूंचा उत्साह वाढविला.
रस्त्याच्या दुतर्फा सासवडकरांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांच्या हातात भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता.
सायकलपटूंनी शर्यतीदरम्यान प्रेक्षकांच्या दिशेने हात उंचावत ‘हाय-फाईव्ह’ देत प्रतिसाद दिला, ज्यामुळे वातावरण अधिकच चैतन्यमय झाले.
स्पर्धेचा शुभंकर (Mascot) लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरला.संपूर्ण परिसर ‘पुणे ग्रँड टूर’च्या फलकांनी सजला होता. शिस्तबद्ध आयोजन व पोलिसांच्या चोख बंदोबस्तात तिसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला.