सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 जिल्हा

नाशिक एरोबॅटिक शो २०२६, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    23-01-2026 11:57:18

नाशिक : ‘नमस्कार, नाशिककरांनो खूप- खूप आभार’. हे शब्द आहेत, भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममधील ग्रुप कॅप्टन अजय दशरथी यांचे. आणि त्यांनी हा संवाद साधला होता गंगापूर धरणावर हवाई प्रात्यक्षिक सादर करताना.भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत आजपासून दोन दिवस एरोबॅटिक शो आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज सकाळी सुर्यकिरण ॲरोबॅटिक टीमने हवाई प्रात्यक्षिक सादर केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना या शोचा आनंद घेण्याचे आवाहन केले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा उपक्रम होत आहे. हा क्षण सैन्य दलाच्या कामगिरीला अभिवादन करण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल, संजीव सिंह, ललित वर्मा, संजीव दयाळ, अजय दशरथी, श्री. विष्णू यांनी या विमानांचे सारथ्य केले, तर फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी या विमानांची तांत्रिक माहिती देतानाच या हवाई प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन केले.

या शोची गेल्या दोन आठवड्यांपासून तयारी सुरू होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनतळ, बैठक व्यवस्था, रस्ते आदी कामे पूर्ण केली, तर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाणी व स्वच्छतेची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले. त्यांच्या मदतीसाठी माजी सैनिक, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी होते. तर विद्युत विभागाने नागरीकांच्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केली होती.

सूर्यकिरणांच्या तेजाने झळाळला आसमंत

भारतीय वायू दलाच्या विमानांनी केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि हजारो नाशिककरांनी ‘भारत माता की जय’, वंदे मातरमसह विविध देशक्तीपर गीतांच्या जयघोषात त्याला दिलेल्या प्रतिसादाने नाशिकचा आसमंत निनादला. सूर्यकिरण विमानांच्या या कसरतीनी नाशिककरांच्या मनातील देशभक्तीच्या भावनांना व्यापक रूप दिले आणि देशप्रेमाचा हा जनसागर गंगापूर धरण क्षेत्रात एकवटला. सूर्यकिरण टीमच्या हवाई प्रात्यक्षिकांना नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. पोलीस बॅण्डवर वाजविण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी अवघा गंगापूर धरण परिसर दुमदुमला होता.

आज  शुक्रवारी कार्यक्रम सुरु होणार अकरा वाजता

यापूर्वी सुर्यकिरण एरो शो ची वेळ सकाळी 10 वाजेची होती. तथापि, धरण परिसरातील वातावरणामुळे आज शुक्रवार दि. 23 जानेवारीचा कार्यक्रम सकाळी 10 ऐवजी 11 वाजता सुरु होणार आहे. तरी नागरीकांनी सकाळी 10.45 वाजेपूर्वी आपल्या जागी आसनस्थ व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती