बदलापूर : बदलापूर पश्चिमेकडील एका नामांकित खासगी शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चिमुकली नर्सरीमध्ये शिकत असून नेहमीप्रमाणे दुपारी शाळेच्या व्हॅनमधून घरी परतत होती. मात्र, ठरलेल्या वेळेत ती घरी न पोहोचल्याने पालकांनी व्हॅन चालकाकडे चौकशी केली. त्यानंतर उशिराने घरी आलेली मुलगी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. आईने विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर पालकांनी शाळेत जाऊन तक्रार केली असता, सुरुवातीला मुख्याध्यापिकेने चालकाची बाजू घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र, चिमुकलीने चालकाला पाहताच पालकांच्या मागे लपण्याचा प्रयत्न केल्याने पालकांचा संशय अधिक बळावला. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत व्हॅन चालकाला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार स्कूल व्हॅनमध्ये महिला अटेंडंट नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शाळा प्रशासनावरही कारवाईची मागणी होत आहे.
या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय व सामाजिक संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. फॉरेन्सिक पथकाने स्कूल व्हॅनची तपासणी करून पुरावे गोळा केले आहेत. पुढील तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.