पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी, यासाठी डेक्कन पोलीस ठाण्याच्या वतीने नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेदरम्यान शहरातील काही भागांमध्ये वाहतुकीत बदल करण्यात येणार असून, त्यानुसार सोसायटीतील रहिवाशांनीही सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी आपल्या लहान मुलांना तसेच पाळीव प्राण्यांना रस्त्यावर किंवा सोसायटीच्या गेटजवळ मोकळे सोडू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने फुटपाथवर थांबावे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धकांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देता येईल, मात्र कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन डेक्कन पोलिसांकडून करण्यात आले आहे.