ठाणे :- “आपल्या लोकशाहीचा हा उत्सव आहे. संविधानाने दिलेल्या न्याय, अधिकार व स्वातंत्र्याची जाणीव ठेवून प्रजेला केंद्रस्थानी ठेवणे हेच खरे प्रजासत्ताक.” मराठी अस्मितेचा गौरव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमांना गती देणार असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, शशिकांत गायकवाड, उप जिल्हाधिकारी (सा.प्र.) रुपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितिन पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे, तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात, रेवण लेंभे, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की, “मी काय मिळवलं यापेक्षा लोकांना काय दिलं यालाच मी महत्त्व देतो. ठाणे जिल्ह्याला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे.”
तीन-चार वर्षांत शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आदी घटकांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणल्याचा उल्लेख त्यांनी केला. नागरिकांनी विकासाला चालना देणारे सरकार निवडून दिल्याने जबाबदारी वाढल्याचे ते म्हणाले. दावोस येथे 30 लाख कोटींचे MOU साइन झाल्यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
ठाणे जिल्ह्याच्या विकासावर विशेष भर देत श्री. शिंदे म्हणाले की, पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे प्राधान्य आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली. डोअर स्टेप डिलिव्हरीद्वारे 431 ग्रामपंचायतीतील 5 हजार नागरिकांना घरबसल्या सेवा, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या 43 वारसांना तत्काळ नियुक्ती, ठाणे जिल्हा मोबाईल मेडिकल युनिटमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याबाबत श्री. शिंदे यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.
आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील विकासाबदद्ल बोलतना श्री. शिंदे म्हणाले की, धावपळीच्या आयुष्यात मनाचे आरोग्य जपण्यासाठी आपण ‘मायका’ हे मराठीतील पहिलं मानसिक आरोग्य ॲप आणलं आहे. 21 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 31 शाळा आम्ही ‘स्मार्ट’ केल्या आहेत. कल्याणमधील 30 शाळांमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ द्वारे चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. असे श्री शिंदे ठाम पणे म्हणाले. लाडक्या बहिणींना आम्ही दरमहा ओवाळणी देतोय. ते आमचं कर्तव्यच आहे. अनेकांना यातून स्वयंरोजगाराला हातभार मिळाला आहे. मी नेहमीच सांगतो आणि आज पुन्हा सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आपल्या जिल्ह्यातील 47 हजारांहून अधिक लाडक्या बहिणी ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. नदीतल्या जलपर्णीपासून शोभेच्या वस्तू बनवून महिलांनी ‘कचऱ्यातून सोनं निर्माण केल आहे. जवळपास 12 हजार कातकरी कुटुंबांना घरकुल मंजुरी, मेट्रो, रस्ते आणि कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय सुरु झाला आहे.
तसेच ठाण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे अनेक प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामध्ये मेट्रो 4 व 4A चाचणी यशस्वी-लवकरच प्रवासी सेवा, मेट्रो 5 व 12 मुळे ठाणे-कल्याण-नवी मुंबई एकत्रित जोडणी, ईस्टर्न फ्रीवे विस्तार, ठाणे कोस्टल रोड, बोगदा प्रकल्प गतिमान, कोपरी ते पटणी पुल, पटणी–नवी मुंबई एअरपोर्ट एलीव्हेटेड कॉरिडॉर, अवजड वाहनांना शहराबाहेरील मार्ग तयार करुन देण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.
260 मीटर उंच व्ह्यूइंग टॉवर व कन्व्हेन्शन सेंटर ही ठाण्याची जागतिक ओळख बनेल, उद्योग-वाणिज्य व पर्यावरण क्षेत्रातील उपक्रम विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ‘आमणे ग्रोथ सेंटर’ मुळे 176 गावांच्या विकासाला गती मिळणार असून रोजगार निर्मिती, पॉड टॅक्सी प्रकल्प-52 किमी आधुनिक व पर्यावरणपूरक वाहतूक निर्माण करण्याकडे भर देण्यात येत आहे. त्यासाठी जपानी ‘मियावाकी’ पद्धतीने हिरवी जंगले तयार करणे आणि सौरऊर्जा मोठया प्रमाणात वापर वाढविण्यात येत आहे. नैसर्गिक शेतीचा 7 हजार हेक्टरवर विस्तार करण्यात येत आहे. “20% राजकारण, 80% समाजकारण” हाच शिंदेंचा विकास मंत्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे शिंदे म्हणाले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास महाराष्ट्र पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.
ये वंदन की भूमी है … अभिनंदन की भूमी है..
ये तर्पण की भूमी है.. ये अर्पण की भूमी है…
इसका कंकर कंकर शंकर है…
इसका बिंदू बिंदू गंगाजल है…
हम जियेंगे तो इसके लिए…
मरेंगे तो इसके लिए…
या देशभक्तीपर पंक्तींनी श्री. शिंदे यांनी मनोगताचा समारोप केला.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे-डमाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांमार्फत शानदार संचलनही करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सकल्पनेतून साकारलेल्या ई-संजीवनी या ब्लॉकचेन आधारित सुरक्षित डिजिटल प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमध्ये जातप्रामणपत्र, वंशावळ, जमीनीचे वारस शोधणे यासारख्या बाबींची माहिती ऑनलाईन पध्दतीने आणि जलद गतीने प्रप्त करण्यास मदत होणार आहे.
यावेळी पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेवर आधारित ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ ठाणे दिनदर्शिकेचे श्री. शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.या सोहळ्याच्या निमित्ताने ठाणे जिल्हयातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या उत्कृष्ट कार्याच्या योगदानाबाबत क्रीडापुरस्कार 2023-2024 प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हयात उद्भवणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये सामाजिक बांधिलकी, तत्परता व मानवतावादी दृष्टीकोनातून केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आपदा मित्र व आपदा सखी यांचा पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नागरी संरक्षणदल ठाणे, नवी मुंबई यांच्या कार्यालयातील अधिकारी यांचे उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.