सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 जिल्हा

संविधान आपल्या जगण्याचा आधार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    27-01-2026 15:10:28

कोल्हापूर : ७६ वर्षांपूर्वी, १९५० मध्ये आपण केवळ एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतो, तर आपण एक ‘लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून जगाच्या नकाशावर उभे राहिलो. ‘प्रजासत्ताक’ म्हणजे जिथे प्रजेची, म्हणजेच सामान्य माणसाची सत्ता असते. अशा प्रत्येक सामान्य माणसाचा जगण्याचा आधार आपले संविधानच आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. त्यांच्या हस्ते कोल्हापूरमधील मुख्य प्रजासत्ताक दिनाचा समारंभ पोलीस परेड क्रिडांगणावर पार पडला. यावेळी त्यांनी देश, स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान याबाबत योगदान दिलेल्या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करीत आदरांजली वाहिली. समारंभ प्रसंगी प्रथम संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, आणीबाणीतील सहभागी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित जेष्ठ नागरिकांना पुष्प देऊन पालकमंत्री आबिटकर यांनी त्यांचे स्वागत केले.

पहिल्यांदाच पोलीस परेड येथील भव्य क्रीडांगणावर हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले. पालकमंत्र्यांनी परेड कमांडर आरांक्षा यादव परिविक्षाधीन भापोसे यांच्यासोबत परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध विभागांच्या पथकांनी संचलन केले. तसेच यावेळी प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उषाराजे हास्कुलच्या विद्यार्थ्यांनी गोंधळगीत सादर करून विविध शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीतमय कवयितमधून उपस्थितांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली. या समारंभात जिल्हावासीयांना उद्देशून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भाषण केले.

आपल्या शुभेच्छा संदेशात व भाषणात पालकमंत्री आबिटकर म्हणाले, आपल्या महाराष्ट्राच्या मातीने देशाला नेहमीच दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘रयतेचे राज्य’ ही संकल्पना मांडली, जी आजच्या लोकशाहीचा मूळ आधार आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक महापुरुषांच्या त्यागातूनच आज आपण ही लोकशाही उपभोगत आहोत. तरुण हे देशाचे भविष्य असून स्वातंत्र्यसैनिकांनी जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते समृद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. शिस्त, समर्पण आणि राष्ट्रप्रेम हे गुण अंगी बाळगून आपल्याला देशाला विश्वगुरू बनवायचे आहे, यासाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हुतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, संविधानातील मूल्ये जपण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याला व देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया, असेही ते शेवटी म्हणाले.

७७ व्या प्रजासत्ताक दिनी गौरविण्यात आलेले मान्यवर

राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे तसेच जिल्ह्यातून विक्रमी रुपये २ कोटी २४ लाख ९९ हजार सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, सहायक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. भारत मंडपम्, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय लोकगीत स्पर्धेत महाराष्ट्राने सादर केलेल्या डॉ. आझाद नायकवडी यांचे दिग्दर्शनाखालील आई अंबाबाईच्या गोंधळाला संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक मिळाला. यातील विजेते श्रद्धा तानाजी जाधव, जान्हवी सागर कांबळे, अनुष्का प्रकाश शिंदे, रुद्राक्षी प्रसाद हिरेमठ, पायल विशांत खोचीकर, कल्याणी दत्तात्रय चव्हाण, लावण्या रविंद्र चव्हाण, श्रेयश प्रवीण जाधव, रामदास देसाई, ओम प्रसाद तारे व सानिका धोंड यांचा सत्कार करण्यात आला.

कागल येथील गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुस यात्रेत आकाश पाळण्यात अडकलेल्या १८ नागरिकांना सुरक्षित सुटका केल्याबद्दल स्थानक अधिकारी जयवंत मल्हारी खोत, ओमकार श्रीनिवास खेडकर, वाहनचालक अमोल विश्वास शिंदे, फायरमन प्रमोद प्रभाकर मोरे व अभय रावसाहेब कोळी यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, कार्यक्रम समन्वय प्रज्ञा संकपाळ, जिल्हा सल्लागार (NTPC) विक्रम आनंदराव आरळेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज किरण जयसिंग पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज रघुनाथ पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजीत बाबासो धनवडे, बँक ऑफ इंडिया जिल्हा प्रबंधक पुनित द्विवेदी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनार व विद्या पाटील यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मानले.

प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन

भारतीय प्रजासत्ताक 76 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदन प्रसंगी सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व उपस्थितांना यावेळी शुभेच्छा दिल्या


 Give Feedback



 जाहिराती