मुंबई : भारताचे संविधान आणि लोकशाही मूल्ये यांच्या बळावरच आज भारत वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात व्यक्त केला. महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील आणि संविधानाच्या बळावर सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहील, असेही ते म्हणाले.\
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी, विविध देशांच्या वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करत, संविधान निर्मितीसाठी त्यांनी व संविधान समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली असून त्यांचे प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येते, असे त्यांनी सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली बंधुतेची भावना संविधानाच्या केंद्रस्थानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडे आज एक महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, हे यश संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थेमुळेच शक्य झाले आहे. महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या मूल्यांवर राज्याची प्रगती सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईसह राज्यातील सर्व भागांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवून राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र नवे विक्रम प्रस्थापित करीत असून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारखे प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.\
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरांच्या निर्मितीचा विक्रम
अनुसूचित जाती-जमातींसह वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरांची निर्मिती हा एक विक्रम असणार आहे. सौर कृषी वाहिनी, सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप यामध्येही राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “लाडकी बहीण” योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना यासह विविध लोकाभिमुख योजनांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
संचलनात विविध पथकांचा सहभाग
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारतीय नौदल; गोवा पोलीस; राज्य राखीव पोलीस बल; बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल; बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक; बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस दल; गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक; गृह रक्षक दल (पुरुष); बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल; गृहरक्षक दल (महिला); राज्य उत्पादन शुल्क विभाग; वन विभाग: मुंबई अग्निशमन दल; बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल; सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा; राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली); सी.कॅडेट कोअर (मुली); सी.कॅडेट कोअर (मुले); रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) सेंट पॉल हायस्कूल, दादर, मुंबई; रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल, दादर, मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डा सिल्वा हायस्कूल दादर, मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल, मनपा (मुली) वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळा, घाटकोपर (पूर्व), मुंबई; रोड सेफ्टी पेट्रोल मनपा (मुले) जी.व्ही. स्कीम मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळा, सायन भोईवाडा, मुंबई; भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुली); भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुले); स्टुडंट पोलीस कॅडेट (मुले/मुली) पुणे विद्याभवन पंतनगर आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगर, मुंबई यांच्यासह पाईप बँड, महिला पाईप बँड, ब्रास बँड पथक, अश्वदल पोलीस पथक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय नौदल, बृहन्मुंबई पोलीस दल, महिला निर्भया पथक आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांनी संचलनात सहभाग घेतला. नौदलाचे कमांडर पंकज बघेल हे संचलन प्रमुख होते.
प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ
ग्रामविकास व पंचायतराज विभाग; मराठी भाषा विभाग; सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग; पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग; सार्वजनिक आरोग्य विभाग; सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग; पर्यटन विभाग; जलसंपदा विभाग; इतर मागास बहुजन कल्याण विभाग; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग; सांस्कृतिक कार्य विभाग; आदिवासी विकास विभाग; कृषी विभाग; गृह विभाग, वाहतूक; अल्पसंख्याक विभाग; उच्च व तंत्रशिक्षण विभाग; कामगार विभाग; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग; गृहनिर्माण विभाग; वन विभाग आणि ऊर्जा विभागाच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तर, किरण शिंदे, अरुण शिंदे, विवेक शिंदे आणि कु.आराध्या शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले.