पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे एका इंजिनिअर विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर-चौधरी (वय २८) असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दीप्तीला मुलगी झाल्याच्या कारणावरून सातत्याने छळ सहन करावा लागला. तसेच हुंडा आणि चारचाकी वाहनासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दुसऱ्यांदा गर्भात मुलगी असल्याचे समजल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणी दीप्तीचे पती, दीर, सरपंच असलेली सासू आणि शिक्षक सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, ही घटना घरात असलेल्या तिच्या तीन वर्षांच्या मुलीसमोर घडल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून, हुंडाबळी आणि विवाहित महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त होत आहे