पुणे: आजची सकाळ केवळ एक बातमी घेऊन आली नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक खोल पोकळी निर्माण करून गेली.
विमान अपघाताच्या दुर्घटनेत अजित दादा पवार यांचे अकाली जाणे, ही केवळ एका नेत्याची exit नाही तर एका काळाचा, एका शैलीचा, एका धडाकेबाज प्रवासाचा अचानक पडदा आहे.
अजित पवार हे नाव केवळ पदांशी जोडलेले नव्हते. ते एक वृत्ती, एक टेम्परामेंट, एक वर्क कल्चर होते. सकाळी सहा वाजता कामाला लागणारा, फाईल्सपेक्षा वेळेला अधिक महत्त्व देणारा, निर्णयात विलंब न करणारा आणि “जे आहे ते तोंडावर” सांगणारा नेता, असा अजित पवारांचा ठसा प्रशासनावर, राजकारणावर आणि जनमानसावर खोलवर उमटलेला आहे.
वरकरणी कठोर, आवाजात जरब, शब्दांत धार. पण त्यामागे एक विलक्षण स्पष्टता होती. त्यांना राजकारणाबद्दल कोणताही भ्रम नव्हता. हे साधुसंतांचे क्षेत्र नाही, हे त्यांनी कधी लपवले नाही. सत्ता, विरोध, डावपेच, व्यवहार असे सगळे घटक समजून, मोजून चालणारा हा नेता होता. म्हणूनच विचारधारा बदलल्या, समीकरणे बदलली, युती बदलल्या; पण सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याची क्षमता त्यांनी कायम जपली.
गेल्या दोन दशकांत “उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री” हे समीकरण अजित पवारांशिवाय अपूर्ण वाटू लागले होते. मुख्यमंत्री पद त्यांच्या आवाक्यात असूनही दूर राहिले, ही खंत कदाचित त्यांच्या मनात कायम राहिली असेल. पण तरीही त्यांनी काम थांबवले नाही. पदापेक्षा कामाला महत्त्व देणारा हा नेता शेवटपर्यंत कार्यरत राहिला.
शरद पवार हे त्यांचे दैवत. त्यांच्याच छायेत वाढले, पण त्या छायेत अडकून राहिले नाहीत. स्वतःची ओळख, स्वतःचा मार्ग आणि स्वतःची शैली त्यांनी निर्माण केली. मतभेद झाले, वेगळे निर्णय घेतले, पण नात्याचा सन्मान कधी सोडला नाही. “मार्गदर्शन करा, आशीर्वाद द्या” ही भूमिका त्यांनी शेवटपर्यंत जपली.
ग्रामीण भाषेचा बाज, मिश्कील पण कधी अंगलट येणारे विनोद, अचानक भडकणारी जीभ आणि त्याच वेळी स्वतःवर हसण्याची तयारी, यामुळे ते सतत चर्चेत राहिले. व्हायरल क्लिप्स, ब्रेकिंग न्यूज, माध्यमांशी खटके… सगळं होतं. पण तरीही, दादा हे मीडियाचे लाडकेच राहिले. कारण ते खरे होते, बनावटी नव्हते.
पराभव त्यांना नवे नव्हते. मुलगा, पत्नी, स्थानिक स्वराज्य संस्था अनेक ठिकाणी धक्के बसले. पण अजित पवार कधी खचले नाहीत. उलट, प्रत्येक पराभवानंतर अधिक तीव्रतेने, अधिक अभ्यासाने आणि अधिक तयारीने ते मैदानात उतरले. राजकारण हा त्यांचा श्वास होता, ध्यास होता, पिंड होता.
बारामती हे त्यांचे केंद्र. राज्य, देश, जग याकडे लक्ष ठेवतानाही त्यांची नजर कायम आपल्या मातीत रोवलेली होती. मुंबई–बारामती हा प्रवास त्यांनी असंख्य वेळा केला. दुर्दैवाने, हाच प्रवास त्यांचा अखेरचा ठरला.
आज अजित पवार गेले, पण त्यांची शैली, त्यांचा धडाका, त्यांची स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कामाची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहील.
बारामतीकरांसाठी, पवार कुटुंबासाठी आणि विशेषतः शरद पवार यांच्यासाठी हा आघात असह्य आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना लाभो, हीच प्रार्थना.
उमद्या स्वभावाचा, वादग्रस्त पण प्रभावी, कठोर पण कार्यक्षम —
‘दादा’ म्हणून ओळखला जाणारा हा नेता आज शांत झाला आहे.
मात्र त्याने निर्माण केलेली राजकीय उर्जा, आठवणी आणि ठसा कधीही मिटणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली.