बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाला आहे. नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले आहेत.राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री कु. अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहूल कुल, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे अश्रु अनावर झाले होते. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राने एक रूबाबदार नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील नेते मंडळींपर्यंत, अनेकांनी पोस्टद्वारे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आपल्या भावनांना वाट मोकळी केली.
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या कर्मभूमी अर्थात बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत.अजित पवार यांच्या निधनाची बातमी मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं. तसेच बारामतीत दाखल झाले.
विद्या प्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली.सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीत दाखल झाले आहेत. त्यांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत दु:ख व्यक्त केलं.देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सांत्वन केलं.