सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. हे न कळणारे आणि न पचणारे सत्य असून, अशा उमद्या आणि संवेदनशील माणसाला पारखे झालो आहे, अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
इतक्या उमद्या आणि संवेदनशील माणसाचे अचानक जाणे मन मान्य करायला तयार नाही. कालच आपण एकत्र होतो, आज त्यांचे अचानक जाणे हा भास आहे की स्वप्न असा प्रश्न पडावा, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवार हे प्रशासनावर पकड असलेला ‘अभ्यासू’ नेता होते. गेल्या ३५ वर्षांत आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा सर्व भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. कुठल्याही विषयाचे आकलन करून घेण्याची त्यांची वृत्ती अफाट होती. या कठीण काळात आम्ही सर्वजण पवार कुटुंबाच्या पाठीशी आहोत, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.