पुणे : रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांच्या वतीने आयोजित 'रोटरी स्पेल बी स्पर्धा २०२५-२६' मध्ये नॉलेज हॅबिटॅट स्कूलने विजेतेपद पटकावले.इंग्रजी माध्यमातून नॉलेज हॅबिटॅट स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर एमईएस बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेते ठरले. मराठी माध्यमातून एच एच सी पी हायस्कूल फॉर गर्ल्स, हुजूरपागा ने विजेतेपद मिळवले, तर जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स शाळेला उपविजेते पारितोषिक देण्यात आले.एमआयटी-केंब्रिज आणि रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांनी एकत्रितपणे आयोजन केले.
उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे एमआयटी स्कूल ऑफ होलिस्टिक्सचे संचालक डॉ. अतुल पाटील होते, तर समारोप समारंभाला फर्ग्युसन कॉलेजच्या इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. माधुरी गोखले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.या प्रकल्पाचे प्रमुख रोटेरियन डॉ. जे. श्रीधर होते, अध्यक्ष मोहन पूजारी, माजी अध्यक्ष शांती श्रीधर, दीपक टक्कर, व्ही. एस. श्रीनिवासन, कमांडर गिरीश कोनकर,कार्मेलिन सेक्वेरा , संजय करवा तसेच अन्य सदस्यांनी यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.ही स्पर्धा २२ जानेवारी २०२६ रोजी पुण्यातील सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग, मॉडेल कॉलनी येथे पार पडली.
विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्य वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि आरोग्यदायी स्पर्धेला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत पुणे आणि परिसरातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिक्षक आणि पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रम यशस्वी ठरला.इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी चार विद्यार्थ्यांच्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. ही एकदिवसीय स्पर्धा असून त्यामध्ये दोन लेखी फेऱ्या आणि तीन तोंडी फेऱ्यांचा समावेश होता. यंदाच्या वर्षी स्पर्धा अधिक समावेशक करत मराठी व अन्य माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बक्षिसांची तरतूद करण्यात आली होती.