बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28 जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शुक्रवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात, ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी राख सावडण्याचा विधी पार पडला. यावेळी वातावरण अत्यंत भावूक झाले होते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर (माजी ट्विटर) एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत काका अजित पवारांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.“जिथं विकासाची बाग फुलवली, तिथंच राख सावडावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं”
रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,“अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली, तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कुणाचंच काही चालत नाही.”दादांच्या जाण्याने मन सुन्न झाल्याचं सांगत त्यांनी लिहिलं की,“काय झालं, कसं झालं आणि का झालं… हे प्रश्न सतत मनात घोळत आहेत. शेवटच्या काही दिवसांत झालेल्या चर्चा, संवाद सतत कानात घुमतायत. जणू तुम्ही अजूनही आमच्याशी बोलत आहात, असा भास होतोय.”
“कडक दिसणारा पण मनाने अतिशय मृदू नेता”
रोहित पवारांनी अजित पवारांच्या नेतृत्वगुणांचंही भावनिक वर्णन केलं.“तुमची काम करण्याची पद्धत, प्रशासनावरची पकड, स्पष्ट बोलणं, वेळेचं काटेकोर नियोजन याचं आम्हाला कायमच कौतुक वाटायचं. बाहेरून कडक वाटणारे दादा प्रत्यक्षात मात्र फणसासारखे — वरून कठीण पण आतून अत्यंत गोड.”
“आमच्यासारखे लाख गेले असते, पण…”
या पोस्टमधील सर्वात भावूक भागात रोहित पवार म्हणतात,“आमच्यासारखे लाख गेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू असा का नेलास? एका क्षणात लाखो लोकांची स्वप्नं का उद्ध्वस्त केलीस?”ते पुढे म्हणतात,“महाराष्ट्रासाठी दिवसरात्र झटणारा माणूस एका क्षणात असा निघून जाईल, यावर विश्वासच बसत नाही. नियतीला जाब विचारावा वाटतो, पण तो कुठे विचारायचा हेही कळत नाही.”
“दादा, तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय…”
पोस्टच्या शेवटी रोहित पवारांनी अत्यंत भावूक शब्दांत भावना व्यक्त केल्या.“आज राख जमा करताना वाटत होतं, तुम्ही फिनिक्स पक्षासारखे पुन्हा उभे राहाल आणि म्हणाल — ‘अरे वेड्यांनो, का रडताय? कामाला लागा, महाराष्ट्रासाठी अजून खूप काही करायचं आहे.’दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय. Love you दादा…”रोहित पवारांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.