मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत सध्या अंतर्गत चर्चा सुरू असून, “पक्षाची सूत्रे पवार कुटुंबाकडेच राहावीत” असा मतप्रवाह अनेक नेत्यांकडून पुढे येत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आधी पक्षाचं नेतृत्व ठरवणं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणं, असा प्राधान्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरवण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय काहीसा पुढे ढकलला जाऊ शकतो.
सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचं अध्यक्षपद द्यावं, अशी भूमिका पक्षातील काही वरिष्ठ नेते घेत असल्याची माहिती आहे.पक्ष हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली वाढला असल्याने, अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहावं, असा सूर ऐकायला मिळतोय.काही नेत्यांच्या मते, सुनेत्रा पवार या एकाचवेळी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात.
प्रफुल्ल पटेल यांचं नावही चर्चेत
दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडेच जबाबदारी सोपवण्याकडे कल अधिक आहे.विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनाही सध्या वेग आला आहे. त्यामुळे हा निर्णय त्याच पार्श्वभूमीवर घेतला जाऊ शकतो.
फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले,“देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पक्षातील आमदारांशी सल्लामसलत करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. उपमुख्यमंत्रीपदाबाबत सध्या कोणतंही नाव ठरलेलं नाही. सर्वांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.”सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत थेट चर्चा झाल्याचं त्यांनी नाकारलं.
पवार कुटुंबाकडून अंतिम निर्णय अपेक्षित
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. पवार कुटुंबातील प्रमुख नेते एकत्र बसून पुढील दिशा ठरवतील, अशी माहिती आहे.याआधी झालेल्या चर्चांमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे सहभागी होते. आता अंतिम निर्णयासाठी पुन्हा एकदा पवार कुटुंबाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.