सोलापूर : बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून भावाने थेट मेहुण्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणासाठी बोलावून वाद घालत काचेच्या बाटलीने गळ्यावर वार करत हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास पांगरी (ता. बार्शी) येथे घडली. या प्रकरणात सुशील दिलीप क्षीरसागर (रा. अरणगाव) यांचा मृत्यू झाला असून, ऋषिकेश मरिबा क्षीरसागर असे आरोपीचे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
सुशील क्षीरसागर आणि रेश्मा यांचा सुमारे वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, हा विवाह रेश्माच्या कुटुंबाला मान्य नव्हता. विवाहानंतर दोघे पुण्यात वास्तव्यास होते.23 जानेवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त हे दांपत्य येरमाळा येथे आले होते. त्यानंतर 28 जानेवारी रोजी कुटुंबीयांसह पांगरी येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असताना, सुशील आणि ऋषिकेश यांच्यात वाद झाला.वादाचे रूपांतर गंभीर भांडणात झाले आणि रागाच्या भरात ऋषिकेशने काचेची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत सुशीलला तातडीने पांगरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांची कारवाई सुरू
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पांगरी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश क्षीरसागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.ही घटना प्रेमविवाहाला असलेल्या सामाजिक विरोधाचे भयावह रूप पुन्हा एकदा समोर आणणारी ठरली आहे.