सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

मोठी बातमी : शरद पवार पुन्हा मैदानात – नीरा नदीच्या पाहणीसाठी बारामतीत सक्रिय

डिजिटल पुणे    30-01-2026 18:08:13

पुणे : अजित पवारांच्या निधनानंतर भावनिक अवस्थेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आता पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचं चित्र दिसत आहे. बारामतीतील नीरा नदीच्या प्रदूषणाच्या पाहणीसाठी स्वतः शरद पवार नदीकाठी पोहोचले असून, यामुळे बारामतीच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

अजित पवार हयात असताना बारामतीतील बहुतांश जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर होत्या. शरद पवारांनी तेव्हा प्रामुख्याने राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर परिस्थिती बदलताना दिसत आहे. आता शरद पवार स्वतः बारामतीतील प्रश्नांमध्ये लक्ष घालत असल्याचं स्पष्ट होत आहे.

नीरा नदीच्या प्रदूषणाची थेट पाहणी

बारामतीजवळील नीरा-वाघज परिसरात नदीच्या वाढत्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले. स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. नदीप्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून यावर तातडीने उपाययोजना आवश्यक असल्याचे संकेत त्यांनी दिल्याची चर्चा आहे.

बारामतीची सूत्रे पुन्हा शरद पवारांकडे?

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीचं नेतृत्व कोण करणार, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ही सक्रियता महत्त्वाची मानली जात आहे. बारामतीची जबाबदारी पुन्हा स्वतःकडे घेण्याचा त्यांचा संकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे नेतृत्व करावे, अशी मागणी करत आहेत. त्याचबरोबर पार्थ पवार यांच्यासाठीही भूमिका ठरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. अजित पवार गटाचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहावं यासाठीही हालचाली होत असल्याचं बोललं जात आहे.

जुनं नातं पुन्हा अधोरेखित

शरद पवार आणि बारामती यांचं नातं दशकांपासूनच घट्ट राहिलं आहे. नीरा नदीच्या पाहणीच्या निमित्ताने ते पुन्हा बारामतीत सक्रिय झाल्याने, “बारामती आणि पवार साहेब” हे समीकरण पुन्हा केंद्रस्थानी येत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती