नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, गावाचे उपसरपंच जयराम पवार यांनी पत्नी जिजाबाई पवार यांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला होता. त्यानंतर रात्री झोपेत असलेल्या जिजाबाई पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जयराम पवार याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
परिसरात खळबळ
घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावाचा उपसरपंचच आरोपी निघाल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. पुढील तपास कळवण पोलीस करत आहेत.