मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
शपथविधीपूर्वी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. यासंदर्भात पक्षाकडून अधिकृत पत्रही विधानसभेला देण्यात आले आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासोबत काही महत्वाची खाती कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थ खाते सध्या वगळण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडेच राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खाते पुन्हा त्यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या शपथविधीत केवळ सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून अन्य कोणाचाही शपथविधी होणार नाही. त्या बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
शपथविधीपूर्वी शरद पवारांची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, “मला याबाबत अधिक माहिती नाही, मी फक्त बातम्यांमधून वाचलं. अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, आता पक्षाने पुढचा निर्णय घेतला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. आमचा राजकीय मार्ग वेगळा आहे.”तसेच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही भाष्य करणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.