पुणे : राष्ट्र सेवा दल या संघटनेचे विश्वस्त असल्याचे भासवत राष्ट्र सेवा दलाच्या घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव ज्येष्ठ पत्रकार ,राष्ट्र सेवा दल माजी अध्यक्ष नितीन वैद्य, माजी आमदार कपिल पाटील आणि अबेद खान यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेला प्रस्ताव सत्य कागदपत्रांची पुर्तता करता न केल्याने धर्मदाय सहाय्यक आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. गेली काही वर्ष संघटनेत चाललेल्या बेकायदा हस्तक्षेपामुळे उद्भवलेला वाद आता संपुष्टात येणार आहे.या प्रकरणी घटना बदलाच्या प्रस्तावाविरुद्ध धर्मादाय आयुक्तांकडे आक्षेप घेणारे राष्ट्र सेवा दलाचे सदस्य आणि माजी पूर्ण वेळ कार्यकर्ते श्याम निलंगेकर(नांदेड) यांनी पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नितीन वैद्य, माजी आमदार कपिल पाटील आणि अबेद खान यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे दाखल केला होता. राष्ट्र सेवा दलातील पदाधिकारी नियुक्ती आणि कालावधी या संदर्भात ही घटना दुरुस्ती होती. मात्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम निलंगेकर यांनी या घटना दुरुस्तीबाबत आक्षेप अर्ज दाखल केला होता. कपिल पाटील हे विश्वस्त नाहीत, संघटनेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींना पदाधिकारी करण्यात आले होते. बेकायदेशीरपणे पदे मिळवत ही मंडळी आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आक्षेप श्याम निलंगेकर यांनी घेतला होता.
घटना दुरुस्तीच्या योजना प्रस्तावाला श्याम निलंगेकर यांनी आक्षेप घेतल्यानंतर कपिल पाटील, नितीन वैद्य, अबेद खान यांची अडचण झाली. ते किंवा त्यांचे वकील हे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांसमोर एकाही तारखेला हजर झाले नाहीत. आपला दावा सिद्ध करणारी कागदपत्रही त्यांना सादर करता आली नाहीत, श्याम निलंगेकर मात्र प्रत्येक तारखेला हजर राहून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते.अखेर चार वर्षांनी म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांनी कपिल पाटील आणि इतरांनी दाखल केलेला प्रस्ताव फेटाळून लावला. तसा आदेशही जारी केला आहे.
'कपिल पाटील आणि मंडळी आड मार्गाने राष्ट्र सेवा दलात शिरले. आपली राजकीय ताकद वापरून त्यांनी संघटना ताब्यात घेत अरेरावी चालवली. सेवा दलाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, सेवाभावी पूर्णवेळ कार्यकर्ते यांना अपमानास्पद वागणूक देत संघटनेतून बाहेर काढलं. पाटील यांनी आपली माणसं घुसवली. बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार केला. यावरून संघटनेत संघर्ष सुरू झाला. आता या मंडळींची हुकूमशाही संपली आहे,' असे श्याम निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे.