सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

डिजिटल पुणे    31-01-2026 17:33:52

मुंबई: बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला. पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याद्वारे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना मंत्रीपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. हा सोहळा अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण झाला.

गटनेतेपदी निवड कशी झाली?

शपथविधीपूर्वी विधिमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले. यानंतर धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांसह इतर नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत निवडीचे अधिकृत पत्र सादर केले. हे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवले आणि त्यानंतर शपथविधी निश्चित झाला.

शपथ घेताच बारामतीकडे रवाना

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच थांबणार आहेत. या काळात त्या कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटी स्वीकारणार असल्या तरी कोणतेही सत्कार, हार-तुरे किंवा जाहीर कार्यक्रम स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सुनेत्रा पवार यांचा प्रवास

सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी काटेवाडी (बारामती) येथे सामाजिक कार्याला सुरुवात केली.

काटेवाडीतील ग्रामस्वच्छता चळवळ, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांसाठी आरोग्य जनजागृती तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे या कामांत त्यांचा मोठा सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.

राजकारणातील प्रवेश

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला. जरी त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. तेथे त्यांनी तालिका अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती