बीड : बीड तालुक्यातील लिंबारुई येथे विहिरीत आढळलेल्या मायलेकाच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. मोबाईल फोनवरून झालेल्या कौटुंबिक वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 डिसेंबर 2025 रोजी लिंबारुई गावातील एका विहिरीत प्राजक्ता उर्फ रामेश्वर दराडे (वय अंदाजे 28) आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा वेदांत यांचे मृतदेह आढळले होते. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सखोल तपासानंतर धक्कादायक वास्तव समोर आले.
पोलीस तपासानुसार, मोबाईल फोनवरून प्राजक्ता यांचे पतीसोबत सातत्याने वाद होत होते. पतीने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने त्या मानसिक तणावात होत्या. याच नैराश्यातून त्यांनी प्रथम मुलाला विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही उडी घेऊन जीवन संपवले, असे निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.