मुंबई : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही मोठे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. “अजित पवार यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराशी संबंधित महत्त्वाची फाईल होती, असे ते सांगत होते आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत त्यांचा विमान अपघात झाला,” असा दावा राऊत यांनी केला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष आता मराठमोळ्या नेतृत्वाचा राहिलेला नाही, तर तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रभावाखाली गेल्याचे चित्र आहे. पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा दावा केल्यानंतर घेतलेल्या यु-टर्नवरही त्यांनी टीका केली.
राऊत यांच्या मते, अजित पवार कधीही भाजपच्या विचारसरणीशी पूर्णपणे जुळले नव्हते. सत्तेच्या राजकारणामुळे ते भाजपसोबत गेले, मात्र त्यांच्यावर ईडी, सीबीआयच्या कारवाईची भीती दाखवली गेल्याचा आरोप त्यांनी केला. “आपली प्रकरणे मार्गी लावल्यानंतर अजितदादा पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत होते, पण दुर्दैवाने ते शक्य झाले नाही,” असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, अजित पवार प्रत्येक निर्णयासाठी भाजपवर अवलंबून नव्हते. त्यांनी स्वतःच्या राजकीय भूमिकेनुसार निर्णय घेतले. “आज दादा हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावाने राजकारण होऊ नये,” असा टोला त्यांनी लगावला.
विमान अपघाताबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर बोलताना राऊत म्हणाले की, हे प्रकरण साधे नाही. “15 जानेवारीला अजित पवार म्हणाले होते की माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती जाहीर करणार आहे. त्यानंतर दहा दिवसांत त्यांचा अपघात झाला, हे संशयास्पद आहे,” असे त्यांनी सांगितले. अपघातातील मृतदेह, कागदपत्रे आणि सहाव्या प्रवाशाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.या सगळ्या घडामोडींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूभोवतीचे राजकारण पुन्हा तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे