मुंबई : जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील खोपोली टोल नाक्याजवळ भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रासायनिक पदार्थ वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने गेल्या २४ तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रवासी अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीतही टोल वसुली सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी तात्पुरती टोल वसुली थांबवण्याचे निर्देश देणार असल्याचे सांगितले.
मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता आडोशी बोगद्याजवळ रसायन वाहून नेणारा टँकर उलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि जुन्या महामार्गावरही वाहनांची लांबच लांब रांग लागली. २४ तास उलटूनही टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही, अशी माहिती समोर येत आहे.
अपघातस्थळी रस्ते प्राधिकरण किंवा संबंधित यंत्रणेचे अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. परिणामी, मोठ्या प्रमाणावर वाहने जुन्या मार्गावर वळवण्यात आली आणि खोपोली परिसरात प्रचंड कोंडी झाली. प्रशासनाकडून वाहतूक कोंडीची कोणतीही पूर्वसूचना देण्यात न आल्याने शेकडो प्रवासी तासनतास अडकून पडले.
टोल वसुली थांबवणार
प्रवाशांचा रोष वाढल्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सध्या प्राधान्य रस्ता मोकळा करण्याला आहे. ही परिस्थिती दुर्दैवी असून तातडीने तोडगा काढला जाईल. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील. या कोंडीच्या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेसवेवर टोल आकारू नये, अशा सूचना देण्यात येतील.”
प्रवाशांची गैरसोय
या कोंडीत पहाटे प्रवास करणाऱ्यांना सर्वाधिक त्रास झाला. काही गंभीर आजारी रुग्ण आणि कर्करोगाचे रुग्णही अडकले असल्याचे समजते. तासन्तास अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली नाही. मात्र टोल नाक्यांवर टोलवसुली सुरूच होती, ज्यामुळे प्रवाशांचा संताप आणखी वाढला.खालापूर टोल नाक्यावर अनेक प्रवाशांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली असून, कोंडीबाबत पूर्वसूचना न दिल्याची तक्रार केली आहे.