सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदे गटाकडून कोण? दोन अनुभवी महिलांची जोरदार चर्चा

डिजिटल पुणे    05-02-2026 12:38:39

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांत अंतर्गत हालचाली तीव्र झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 7 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत, तर 11 फेब्रुवारी रोजी विशेष सभेत महापौर व उपमहापौरांची निवड जाहीर केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सभागृह सुरू होण्याच्या 15 मिनिटे आधी असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर उपमहापौरपद आणि सुधार समितीचे पद शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमहापौरपदी महिला नगरसेविकेची नियुक्ती केली जाईल, असे जवळपास निश्चित समजले जात आहे. सुधार समितीचे नेतृत्व मात्र पुरुष नगरसेवकाकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

उपमहापौरपदासाठी दोन नावांची चर्चा

शिंदे गटातून उपमहापौरपदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते.तृष्णा विश्वासराव या 2014 मध्ये सभागृह नेत्या होत्या आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव महत्त्वाचा मानला जातो.यामिनी जाधव यांचे नाव यापूर्वीही महापौरपदासाठी चर्चेत होते; मात्र त्यावेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाली होती.आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला संधी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नगरसेवकांना मुंबई सोडण्यास मनाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे आदेश दिले आहेत. 11 फेब्रुवारीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शहर सोडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.9 फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रा असल्याने काही नगरसेवक कोकणात जाण्याची शक्यता होती; मात्र पक्षांनी त्यावर कडक भूमिका घेतली आहे. शिवसेना (ठाकरे), भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांनी 10 फेब्रुवारीपर्यंत नगरसेवकांची मुंबईतील उपस्थिती अनिवार्य केली आहे.

मुंबई महापालिकेतील पक्षनिहाय बलाबल

भाजप – 89

शिवसेना (ठाकरे गट) – 65

शिवसेना (शिंदे गट) – 29

काँग्रेस – 24

मनसे – 6

एमआयएम – 8

राष्ट्रवादी काँग्रेस – 3

समाजवादी पार्टी – 2

राष्ट्रवादी (शप) – 1

एकूण जागा – 227

महापौर निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे मुंबईच्या राजकारणात नवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती