पुणे : पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई विश्राम कुलकर्णी यांनी अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थिती दर्शवली. या बैठकीत यंदाच्या केंद्रीय अंदाजपत्रकात रेल्वे विभागासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, नव्या धोरणात्मक निर्णयांबरोबरच भविष्यातील विविध विकासात्मक योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान लोकसभा व राज्यसभेतील खासदारांसमोर रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल प्रेझेंटेशन सादर केले. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, प्रवासी सुरक्षितता, तंत्रज्ञानाधारित सुधारणा तसेच आधुनिक रेल्वे सेवांच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देत स्पष्टता आणली.
देशाच्या वाढत्या वाहतूक गरजांना पूरक ठरेल अशी आधुनिक, सुरक्षित व कार्यक्षम रेल्वे व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या बैठकीत अधोरेखित झाले. या सकारात्मक संवादातून भविष्यातील रेल्वे विकासासाठी ठोस दिशा निश्चित होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.