मुंबई: मुंबईतील मालाड परिसरातून एक गंभीर स्वरूपाची घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला अयोग्य प्रकारचे व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव सुनील शंकर पवार असून तो कांदिवली पश्चिम येथील रहिवासी आहे. त्याचे वय ४७ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाड पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलींचा पाठलाग करत असे आणि त्यांना आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करायचा. मालाडमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबतही त्याने असाच प्रकार केला. मात्र, घाबरून न जाता मुलीने ही संपूर्ण घटना तिच्या वडिलांना सांगितली.
पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली.आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे इतर मुलींना त्रास दिला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.