सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    09-02-2026 10:42:06

नाशिक : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन आज सायंकाळी ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जानोरीचे सरपंच सुभाष नेहरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद आणि एचएएलचे संजय चौधरी यांनी सामंजस्य कराराचे आदान प्रदान केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकाला विमान प्रवास करता यावा यासाठी देशातील महत्वाच्या शहरात उड्डाण योजनेतंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा संकल्प केला. त्यात नाशिकच्या विमानतळाचा समावेश होता. या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता वाढणार आहे. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहापट भाविक येणार आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहेत. विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात नाशिक अग्रेसर जिल्हा असल्याने निर्यातीला तसेच औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे.

या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे विमानच भरारी घेणार नाही, तर नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेणार आहे. दावोस दौऱ्यात नाशिकसाठी 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.  त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती वाढणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात 30 हजार कोटी रूपयांची विविध विकास कामे  होणार आहेत. गोदावरी नदी निर्मल राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिकचा परिक्रमा मार्ग हा नाशिकचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षितपणे पार पडला. त्या साठी साधू- संत, महंत यांचे सहकार्य लाभले होते. यावेळेसही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कामे सुरू आहेत.  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकार कुठलीही कसर ठेवणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कुंभमेळा मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्वाचा आहे. जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधांची भर पडणार आहे. कुंभमेळ्यामुळे विविध विकास कामे सुरू आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यात भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. विमानतळ विस्तारीकरणामुळे जिल्ह्याचा 22 जिल्ह्यांशी थेट संपर्क होणार आहे. तसेच शेतमाल निर्यातीला.चालना मिळणार आहे. विस्तारित विमानतळाची पर्यटन, निर्यातीत महत्वाची भूमिका राहील, असेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल करण्यासाठी नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण आवश्यक होते. डिसेंबर 2017 मध्ये उडान योजनेअंतर्गत या विमानतळाचा विकास करण्यात आला. तेव्हापासून या विमानतळावर ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. कार्गो वाहतुकीबाबत सदरचे विमानतळ राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. कुंभमेळ्यानिमित्त 23 हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. आणखी चार हजार कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत. श्री. दीक्षित यांनी मनोगत व्यक्त करताना विमानतळाचे काम वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली.


 Give Feedback



 जाहिराती