सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

कासा खडक ते खंदेरी किल्ला हे सागरी अंतर अवघ्या ५ तासांत पोहत गाठण्याचा स्वराजचा नवा विक्रम.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    09-02-2026 10:45:36

उरण : जीवनात जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर हमखास यश मिळते, याची प्रचिती उरण, बाजारपूर येथे राहणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय स्वराज सोनाली संतोष पाटीलने दिली आहे.स्वराजने कासा खडक ते खंदेरी किल्ला हे तब्बल १८ कि.मी.चे सागरी अंतर ५ तास ६ मिनिटांत पोहून पार करत हा धाडसी पराक्रम केला. तो उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सातवी इयत्तेत शिक्षण घेत असून, त्याने आपल्या आईकडून मिळालेला जलतरणाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेला आहे.याआधीही स्वराजने उरणमधील मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे १२ कि.मी.चे सागरी अंतर ४ तास २५ मिनिटांत पोहून पूर्ण केले होते. उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावात तो नियमित आणि कठोर सराव करत असतो.

शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी कासा खडक येथून स्वराजने आपल्या सागरी मोहिमेला सुरुवात केली. काळोख, समुद्रातील प्रचंड लाटा, सोसाट्याचा वारा तसेच मोठमोठी जहाजे अशा अनेक अडथळ्यांवर मात करत त्याने अवघ्या ५ तास ६ मिनिटांत खंदेरी किल्ला गाठून इतिहास घडवला आहे . स्वराज हा कमी वयात कमी वेळेत पोहून विक्रम करणारा पहिला जलतरणपट्टू ठरला आहे.  या धाडसी कामगिरीसाठी स्वराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढ्या लहान वयात इतका मोठा सागरी पराक्रम करणारा स्वराज हा उरण तालुक्याचा अभिमान ठरला आहे. त्याच्या या यशामागे कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा कारणीभूत ठरला आहे. विशेषतः त्याच्या आईने दिलेले मार्गदर्शन आणि जलतरणाची परंपरा पुढे नेण्याची प्रेरणा यामुळेच स्वराज हे यश मिळवू शकला आहे.

या मोहिमेदरम्यान स्वराजच्या सुरक्षिततेसाठी बोट, प्रशिक्षक, तसेच सहकारी जलतरणपट्टू यांची योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याच्या आरोग्यावर आणि वेळेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती असूनही स्वराजने कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने पोहणे सुरू ठेवले, हे विशेष उल्लेखनीय आहे.भविष्यात आणखी मोठी सागरी आव्हाने पेलण्याचा स्वराजचा मानस असून इंग्लिश चॅनेलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्वल करण्याचे स्वप्न तो पाहत आहे. त्याच्या या यशामुळे अनेक लहान मुलांना जलतरणाकडे व खेळाकडे वळण्याची प्रेरणा मिळणार आहे.स्वराज पाटीलचा हा विक्रम म्हणजे जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांचे जिवंत उदाहरण असून “योग्य मार्गदर्शन आणि मेहनत असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही” हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.


 Give Feedback



 जाहिराती