सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

अजित पवार यांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर प्रश्न; स्वतंत्र चौकशीची मागणी

डिजिटल पुणे    11-02-2026 14:42:24

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या तपासावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय मुद्दे मांडत सखोल, स्वतंत्र आणि वेळबद्ध चौकशीची मागणी केली.

रोहित पवार यांनी सांगितले की, अपघातग्रस्त विमान सुमारे १६ वर्षे जुने होते. अपघातापूर्वीच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमके काय घडले, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. विशेषत: विमानाचा ट्रान्सपाँडर बंद का होता आणि कोणताही ‘डिस्ट्रेस कॉल’ का करण्यात आला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

पायलट बदलावर आक्षेप

उड्डाणाच्या काही वेळ आधी दोन्ही पायलट अचानक बदलण्यात आले, याबाबत रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. मूळ नियुक्त पायलट का हटवले गेले आणि हा निर्णय कुणी घेतला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. बदललेल्या पायलटांपैकी एक जण नुकताच परदेशातून परतला होता, ही बाबही संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅप्टनच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह

कॅप्टन कपूर यांच्यावर पूर्वी शिस्तभंग आणि अल्कोहोलसंबंधी तक्रारी होत्या, असा दावा करत रोहित पवार यांनी अशा पायलटला व्हीआयपी उड्डाणाची जबाबदारी का देण्यात आली, असा सवाल केला. तसेच उड्डाणापूर्वी अनिवार्य वैद्यकीय तपासणी आणि अल्कोहोल चाचणी योग्य प्रकारे झाली होती का, हेही तपासले पाहिजे, असे ते म्हणाले.

रनवे आणि हवामानाचा मुद्दा

डीजीसीएच्या नियमानुसार किमान ५००० मीटर दृश्यमानता आवश्यक असताना केवळ ३००० मीटरवर लँडिंगचा प्रयत्न का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच रनवे ११ ऐवजी रनवे २९ वापरला असता तर अपघात टळला असता का, याचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी सुचवले.

कंपनीच्या सुरक्षाविषयक त्रुटींचा आरोप

संबंधित विमान ऑपरेटर कंपनीकडून सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार:

पायलटना आवश्यक १२ तासांची विश्रांती दिली जात नव्हती

काही विमानांमध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बंद ठेवला जात असे

उड्डाणापूर्वीची तांत्रिक तपासणी आणि चेकलिस्ट योग्यरीत्या पाळली जात नव्हती

विमानाच्या उड्डाण तासांची चुकीची नोंद दाखवली गेली असावी

२०२३ च्या अपघाताचा संदर्भ

२०२३ मध्ये मुंबईत याच कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता, मात्र त्याचा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (EASA) माहिती न मिळाल्याने संबंधित ऑपरेटरची तृतीय देशांसाठीची परवानगी रद्द केली होती, असाही दावा त्यांनी केला.

आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी

या प्रकरणात केवळ देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संस्थांचा सहभाग असलेली स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. त्यांच्या मते, पारदर्शक तपासातूनच सत्य समोर येईल आणि सर्व शंका दूर होतील.


 Give Feedback



 जाहिराती