पुणे : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आविष्कारात्मक समस्या निराकरण सिद्धांत आधारित तंत्रज्ञान व नवोन्मेष या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील सहयोगी प्राध्यापक तसेच आविष्कारात्मक समस्या निराकरण सिद्धांत अध्यायाचे अध्यक्ष डॉ. संदीप वानखडे यांनी विद्यार्थिनींना संरचित नवोन्मेष पद्धतीचे सविस्तर मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांमधील तांत्रिक व अतांत्रिक विरोधाभास ओळखून त्यावर शास्त्रीय आणि परिणामकारक उपाय कसे शोधता येतात, हे त्यांनी समर्पक उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
कार्यशाळेप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थिनींमध्ये नवोन्मेषी दृष्टीकोन विकसित होतो. अभियांत्रिकी शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून समस्या सोडवण्याची क्षमता, तर्कशक्ती आणि सर्जनशील विचार विकसित करण्याचा हा एक सातत्यपूर्ण प्रवास आहे.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले असून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे यांनी नवोन्मेषाधारित शिक्षणामुळे विद्यार्थिनींची समस्या सोडवण्याची क्षमता अधिक बळकट होते, असे मत व्यक्त केले.
प्रा. संतोष मिटकरी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. मिलिंद पटवर्धन यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता गोड यांनी प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन डॉ. सिमी खान यांनी केले. या कार्यशाळेस प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.