सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डिजिटल पुणे    12-02-2026 14:49:55

 मुंबई: सामाजिक प्रश्न सोडविताना निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. प्रश्न फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी मांडले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.विधानभवनात ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत फेलोजची सातवी तुकडी तसेच ‘विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पाचवी तुकडी यांच्यासाठी अभ्यासभेट, मार्गदर्शन व चर्चा-संवाद पार पडला. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले, कार्यक्रम समन्वयक प्रिया खान, सह सचिव नागनाथ थिटे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने आणि मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील सातवी तुकडी आणि ‘विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रमातील सातवी तुकडी आणि ‘विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमातील पाचवी तुकडी यांच्या अभ्यासभेटी व मार्गदर्शन सत्रात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी फेलो व इंटर्न्सना मार्गदर्शन केले. या संवादात्मक सत्रात त्यांनी कायदे, शासनाच्या योजना आदी क्षेत्रांचा सखोल अभ्यास करून समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहन केले.स्वतःसाठी वेळ देण्याचे, निसर्ग, संगीत व छंद यांच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापनाचे महत्त्वही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. सतत लोकांशी जोडून राहणे आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे. हेच खरे लोकप्रतिनिधित्व आहे, असे त्यांनी नमूद केले.

या मार्गदर्शन सत्रात फेलो व इंटर्न्सनी विविध सामाजिक व धोरणात्मक प्रश्नांवर विचारमंथन केले. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या उत्सुकतेचे कौतुक करून, प्रश्नांची मांडणी करताना तथ्य, पुरावे आणि सखोल माहिती वापरणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांना भविष्यातील कामासाठी शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील सातवी तुकडी तसेच ‘विधि विधान इंटर्नशिप’ कार्यक्रमातील पाचवी तुकडी यांच्या अभ्यासभेटीच्या निमित्ताने आयोजित मार्गदर्शन सत्रात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी कायदा निर्मिती आणि अर्थसंकल्प याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली.

सचिव-३ डॉ. विलास आठवले म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाचे अधिकार वेगळे आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि सामायिक सूची यांचा उल्लेख करून, कायदे बनविताना विषय कोणत्या सूचीत आहे, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य विधानमंडळाचे स्वरूपही त्यांनी मांडले.संसदीय लोकशाहीची कार्यप्रणाली व निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देत लोकप्रतिनिधींची कायदे व अर्थसंकल्प प्रक्रियेत भूमिका याबाबतही सांगितले. वित्त विभाग, अंदाज समिती आणि विधानमंडळ यांचे कार्य सांगितले. अर्थसंकल्प निर्मिती, संसदीय कार्यपद्धतीचे याबाबतही त्यांनी माहिती दिली.

सह सचिव नागनाथ थिटे यांनी समिती पद्धती व संसदीय आयुधे यावर मार्गदर्शन केले. विधानमंडळातील विविध समित्यांची कार्यपद्धती, त्यांचे महत्त्व तसेच संसदीय प्रक्रियेतील विविध साधनांचा (आयुधांचा) प्रभावी वापर याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना, तात्काळ विषय, ठराव, विधानपरिषदेतील चर्चासत्रे आदी संसदीय साधनांचा उपयोग करून लोकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.यावेळी विद्यार्थ्यांनी विधानमंडळाची दोन्ही सभागृह, ग्रंथालयास भेट देऊन माहिती घेतली.


 Give Feedback



 जाहिराती