उरण : आर. के. एफ. ज. ने. पोर्ट विद्यालय, शेवा. प्राथमिक विभाग मराठी व इंग्रजी माध्यमाचा बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या शानदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन. पी. ए. चे कामगार प्रिय व शाळेचे हितचिंतक असणारे विश्वस्त दिनेश पाटील,रविंद्र पाटील,पंचायत समिती उरण च्या गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत उपस्थित होत्या.त्यावेळी शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, केवल गावंड, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, भुषण जाधव, अंकुश जोगळे, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे , आर. के. एफ. संस्थेचे पदाधिकारी श्रीम. सना खान,प्रितेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांनी भेटवस्तू, शाल आणि तुळशीचे रोप देऊन केले.
प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते नटराज पुजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या नंतर शाळेच्या वर्षभरातील सहशालेय उपक्रम, विशेष स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसे आणि शाळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले. आम्ही भविष्यात शाळेच्या आणि कर्मचारी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून शाळेला गतवैभव प्राप्त करून देऊ असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आर. के. एफ. व्यवस्थापन पदाधिकारी, शालेय सफाई महिला कर्मचारी आणि जे. एन. पी. ए. मेंटेनन्स सर्व विभागातील कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
सर्व वर्ग शिक्षक, स्पेशल शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सदर केलेले सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम एकापेक्षा एक असे दर्जेदारपणे सादर झाले. कुपारी नृत्य, महाराष्ट्र माझा, सारे जहाँसे अच्छा,ईशस्तवन ह्या कार्यक्रमांमधून शाळेच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा रसिकांना अनुभवायला मिळाला. यामागे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची मेहनत फार मोलाची ठरली आहे.यावेळी पालकांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले . मनापासून कौतुक केले . विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याने अप्रतिम गिटार वादन करुन गायन केले असा शाळेचा सर्वाधिक बक्षिसे पटकावणारा आदर्श व हुशार विद्यार्थी कु. नमित वाघावले,मोठ्या कौशल्याने पियानो वादन करणारी कु. श्रेयशी मुंढे आणि जय महाकाली या गाण्यावर दमदार नृत्याविश्कार सादर करणारा कु. दीप कडू या तिन्ही सोलो कार्यक्रम सादर करणारे आणि सर्व सामुहिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या चिमुकल्या बालकलाकारांनी तुफान गर्दी करुन जमलेल्या पालकांना, कलाप्रेमी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन त्यांची वाहवा मिळवली.
प्रत्येक कार्यक्रम सादर होताना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता हिच खरी शाबासकीची थाप विद्यार्थ्यांना मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे आदर्श कलाशिक्षक मिलिंद ठाकूर यांनी आपल्या खास शैलीत केले. शाळेचे सुप्रसिद्ध संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सांगितिक बाजू उत्तमप्रकारे सांभाळली.शाळेच्या गुणी व मेहनती शिक्षिका श्रीम आश्रया शिवकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख उत्तमप्रकारे करुन दिली.श्रीम योगसाधना पाटील यांनी सर्व मान्यवरांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. श्रीम. उज्ज्वला तांडेल, श्रीम. वंदना कपूर आणि श्रीम. सौम्या पाटील यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीचे वाचन उत्कृष्टतेने केले. किशोर म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे फलक लेखन सुंदर हस्ताक्षरात केले. श्रीम. रिना ठाकूर,श्रीम सरिता पाटील, गजानन पाटील, श्रीम नंदा डिगे, घनश्याम पाटील, वसंत कडू, शिवाजी गुरव, पारवे दादा,श्रीम मयुरी म्हात्रे,सर्व विभागातील शिपाई दादा, आया आणि महिला सफाई कामगार, सिक्युरिटी कर्मचारी यांनी सुद्धा उत्तम मेहनत घेऊन या कार्यक्रमास सहकार्य केले.