सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

छत्रपती संभाजीनगरच्या ‘सिटिझन फीडबॅक’ मॉडेलला राज्यभर मान्यता; शासनाचा अधिकृत निर्णय

डिजिटल पुणे    14-02-2026 16:08:26

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून सुमारे सहा महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली शासकीय कार्यालयांतील नागरिक अभिप्राय (Citizen Feedback) प्रणाली आता राज्यभर लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने अधिकृत शासन निर्णयाद्वारे घेतला आहे. जिल्हा पातळीवर यशस्वी ठरलेली ही अभिनव संकल्पना राज्यस्तरावर स्वीकारली जाणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.सदर शासन परिपत्रकानुसार, शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून थेट अभिप्राय घेऊन प्रशासनिक कामकाजात गुणात्मक सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः खालील बाबींचा समावेश असेल 

शासकीय कार्यालयांतील स्वच्छता, मूलभूत सुविधा व सेवा पद्धती

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वर्तन, प्रतिसादक्षमता व कार्यक्षमता

समस्या निवारणाची गती व समाधानाचा दर्जा

पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोकाभिमुख प्रशासन

या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांचा थेट सहभाग वाढवून प्रशासन अधिक जबाबदार, पारदर्शक व परिणामकारक करण्याचा शासनाचा स्पष्ट उद्देश आहे.ही संकल्पना Government Process Re-engineering तसेच District Good Governance Index आणि राज्याच्या सुशासन धोरणाशी सुसंगत असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर ही व्यवस्था राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वीही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेले “माझी शाळा, सुंदर शाळा” यांसारखे उपक्रम राज्यभर आदर्श ठरले होते. जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण प्रयोगांचे राज्य धोरणात रूपांतर होणे, हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण व नवोन्मेषी प्रशासनशैलीचे उदाहरण मानले जात आहे.

दरम्यान, नागरिक अभिप्राय प्रणालीमुळे शासकीय कार्यालयांमधील सेवा गुणवत्ता, कार्यपद्धती व उत्तरदायित्वात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या या पुढाकाराबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, लोकाभिमुख प्रशासनाची दिशा राज्यभर अधिक बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे


 Give Feedback



 जाहिराती