मुंबई: मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात आज शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडला. एलबीएस रोड LBS Road वरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.२० वाजता या अपघाताची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधन यादव (वय अंदाजे ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते नातेवाईकाच्या लग्नासाठी आणि मुंबई दर्शनासाठी आले होते. त्यांच्या सोबत माजी सरपंच महेंद्र यादव तसेच इतर कुटुंबीयही होते. मुलुंड परिसरातून कळवाकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
जखमींची माहिती
उपासनी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार चार जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी:
रामधन यादव – रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत
राजकुमार इंद्रजीत यादव (वय ४५) – आयसीयूमध्ये, प्रकृती गंभीर
महेंद्र प्रताप यादव (वय ५२) – प्रकृती स्थिर
दीपा रुहिया (वय ४०) – प्रकृती स्थिर
घटनेनंतर जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्रशासनाची हालचाल
घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपमहापौरांनी सांगितले की, दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय घडलं?
मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर मेट्रोचे काम सुरू असताना पिलरवरील सिमेंटचा स्लॅब अचानक तुटून खाली पडला. त्यावेळी खालीून जाणाऱ्या रिक्षा आणि कारवर तो कोसळला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्दैवी घटनेमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांत गावी परतण्याचा त्यांचा बेत असतानाच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.