पुणे : पुणे शहरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तीव्र धक्काबुकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने हालचाली करत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा करून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.
जखमी कार्यकर्त्यांच्या उपचारांबाबत सूचना
झटापटीदरम्यान जखमी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची सपकाळ यांनी थेट विचारपूस केली. उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, दवाखान्यातील तपासण्या व आवश्यक वैद्यकीय सेवा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दगडफेकीत कार्यकर्ता जखमी
आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत काँग्रेसचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला टाके घालावे लागले असून डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आहे. काही वाहनांचेही नुकसान झाल्याची नोंद आहे. घटनेत काही पोलिस कर्मचाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जाते.
वक्तव्यावरून वाद पेटला
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि परिस्थिती चिघळली.
‘वक्तव्याची चुकीची मांडणी’ – सपकाळ
घटनेनंतर सपकाळ यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा केला. राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले. काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे
झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भाजपच्या तक्रारीनुसार अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद झाला आहे. तर काँग्रेसच्या तक्रारीनंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह सुमारे शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.पुण्यातील या घटनेमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.