पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत नृत्यधाम स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या सहकार्याने वसंत ऋतूच्या स्वागतार्थ “ ऋतु वसंत' नृत्योत्सव” या विशेष नृत्य महोत्सवाचे आयोजन दि.२१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा महोत्सव सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन,सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे.
वसंत ऋतूच्या स्वागतार्थ आयोजित या दोन दिवसीय नृत्योत्सवात शास्त्रीय नृत्याच्या विविधांगी सादरीकरणांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. पहिल्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता समृद्धी पुजारी, नियती विसाळ,वृंदना मोहरिर आणि अवंती दातार आपल्या नृत्याविष्कार सादर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुग्धा हसमनीस, यशोदा पाटणकर आणि वेदांती भागवत-महाडिक आपल्या कलासादरीकरणातून वसंताच्या भावविश्वाची अभिव्यक्ती साकारतील.नृत्यधाम स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संस्थापक,नृत्यगुरु प्रेरणा देशपांडे यांच्या संकल्पनेतून युवा कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी हा नृत्यमहोत्सव होत आहे.
प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.भारतीय सांस्कृतिक परंपरेचा गौरव आणि शास्त्रीय नृत्यकलेचा प्रसार हा या महोत्सवामागील प्रमुख हेतू असून वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद नृत्यरूपाने साजरा करण्याचा हा प्रयत्न आहे.सांस्कृतिक रसिकांनी या नृत्योत्सवाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.