पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथे विशेष सजावट करण्यात आली असून शिवजन्मस्थळ फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने नटले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त येथे दर्शनासाठी दाखल झाले आहेत.शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पर्यटनमंत्री शंभुराज देसाई व सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.
अकोटमध्ये 30 हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी
अकोला जिल्ह्यातील अकोट येथे शिवजयंतीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तब्बल 30 हजार चौरस फुटांमध्ये शिवरायांची भव्य रांगोळी साकारली. सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांची प्रतिमा या रांगोळीत उभी करण्यात आली आहे.
सुमारे 15 विद्यार्थ्यांनी सहा दिवसांच्या मेहनतीतून ही कलाकृती पूर्ण केली. 40 क्विंटल रंगांचा वापर करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुनील पांडे आणि अनिल काळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सलग तिसऱ्या वर्षी एवढ्या मोठ्या आकाराची रांगोळी साकारल्याने अकोटमध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
लातुरात मध्यरात्री शिवजन्मोत्सव
लातूर शहरात मध्यरात्री 12 वाजता शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात तुताऱ्यांचा निनाद, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उपस्थित महिलांनी पारंपरिक पद्धतीने बाळ शिवबांचा पाळणा झुलवून जन्मोत्सव साजरा केला. मोठ्या संख्येने नागरिकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
भंडाऱ्यातील रॅलीत तलवारीचे प्रदर्शन चर्चेत
भंडारा शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवकालीन युद्धकला, दांडपट्टा आणि विविध शारीरिक कौशल्यांचे सादरीकरण करण्यात आले. हजारो शिवभक्त सहभागी झाले होते.मात्र, रॅलीदरम्यान एका लोकप्रतिनिधीच्या पतीने उघडी तलवार हातात घेतल्याचा प्रकार घडल्याने शहरात चर्चा रंगली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करणे कायद्याच्या चौकटीत बसते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांद्वारे शिवरायांना अभिवादन करण्यात येत आहे.