सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

वर्षअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डिजिटल पुणे    19-02-2026 16:12:28

मुंबई : दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. “बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील, आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना पूर्वीचा सुवर्णकाळ आणि नंतरची घसरण

कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. मात्र, महामारी आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बसखरेदी रखडली. परिणामी २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली. दरम्यान, राज्य शासनाने महिलांना तिकिटात ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला. सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत.

८,३०० बसेसचा भव्य आराखडा

एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून, यंदा पहिल्या टप्प्यात ८,३०० बसेस दाखल होणार आहेत. त्यामध्ये  ३,००० ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने दाखल होतील.  या बसेसना ‘राजमाता जिजाऊ साहेब’ यांचे नाव देण्यात आले असून दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर धावतील.

५,००० साध्या बसेस — निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी १०० मिडी बसेस तसेच २०० अत्याधुनिक बसेस खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी या सर्व बसेस ताफ्यात आल्यावर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे.

खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ साधण्याचा निर्धार

सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये, तर उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. म्हणजेच रोजची तूट १ ते १.५ कोटींच्या घरात आहे.मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी नफा कमावणारा उद्योग नाही; ती राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र, किमान तोटा टाळण्यासाठी खर्च-उत्पन्नाचा समतोल साधणे आवश्यक आहे. नवीन बसेस आल्यावर उत्पन्न निश्चित वाढेल आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल.”

‘लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत

ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या, आदिवासी पाड्यांपर्यंत सेवा, दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या, या सर्वांमुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता नव्या जोमाने, नव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. “यावर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल, हा आमचा दृढ विश्वास आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती