पुणे : शिवजयंतीनिमित्त, महान पराक्रमी योद्धा राजा छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ), पुणे येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य व दिमाखदार अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला.सदर पुतळ्याचे अनावरण वैभव निंबाळकर, आयपीएस, उपमहानिरीक्षक, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे यांच्या हस्ते तसेच सौ. अनुजा निंबाळकर (RCWA प्रमुख) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास अधिकारी, जवान, त्यांचे कुटुंबीय तसेच शहरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. निंबाळकर यांनी शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याची व शौर्यगाथेची आठवण करून देत त्यांचे धैर्य, नेतृत्वगुण, प्रशासन कौशल्य तसेच स्वराज्य आणि न्यायाची तत्त्वे यांचा गौरव केला. तसेच त्यांचे वडील श्री. चंद्रकांत निंबाळकर, सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्ते, यांनीही शिवाजी महाराजांच्या विचारांचे आणि शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात केंद्रीय विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले, तर महिला भजन मंडळाने पालना व शिवगर्जना सादर करून देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. “जय शिवाजी, जय भवानी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.समारंभाचा शेवट छत्रपति शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करून त्यांच्या शौर्य, प्रामाणिकपणा व राष्ट्रसेवेच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प करून करण्यात आला.
