पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, लवळे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबिरा'चे आयोजन दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, लवळे येथे करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे संचालक प्रा. डॉ. हरीश नवले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो होते. यावेळी व्यासपीठावर रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा. श्री. धोंडिबा कुंभार , कार्याध्यक्ष ॲड. उत्तम ढोरेसाहेब, प्रा. भरत कानगुडे, प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर, मा. श्री. सतीश पळणीटकर, मा. सौ. सुषमा पळणीटकर, डॉ. गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो म्हणाले की, महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबर समाजासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जे जे करता येते ते ते करत आहे. शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी असले तरी आज आम्हालाही लवळे गावाचा ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा माहीत झाला आहे. यातून आपले ऋणानुबंध वाढीस लागणार आहेत. पुढे ते म्हणाले की, गावातील नागरिकांनीही महाविद्यालयास आवर्जून भेट द्यावी. कारण मुळशी तालुक्यातील अनुदानित असलेले एकमेव महाविद्यालय माफक फी आणि सर्व अद्ययावत सोयीसुविधांसह शिक्षण देत आहे. त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी घेत आहे. तसेच यापुढेही महाविद्यालय ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे संचालक प्रा. डॉ. हरीश नवले यांनी बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची सविस्तर माहिती देऊन त्याची कार्यपद्धती अधोरेखित केली. कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच ज्येष्ठांना जे कार्यक्रम हवे आहेत ते आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राबविण्यासाठी विद्यापीठाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे सांगितले.
शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये मा. श्री. सतीश पळणीटकर, मा. सौ. सुषमा पळणीटकर यांनी मराठी गीत, भजन, गवळणी, विठ्ठलाची गाणी तसेच हिंदी चित्रपटातील गाणी गाऊन उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी स्वलिखित 'अविनाशपासष्टी' हा गझलवाचनाचा कार्यक्रम सादर केला. तर प्रा. भरत कानगुडे यांनी 'ज्येष्ठांसाठी माहिती तंत्रज्ञान' या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या विषयातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फसवणूक कशाप्रकारे होऊ शकते, हे सांगतानाच फसवणूक होऊ नये म्हणून आपण कोणकोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर भाष्य केले.
शिबिर आयोजनासाठी संस्था पदाधिकारी उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव मा. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) मा. ए. एम. जाधव तसेच लवळे गावचे माजी सरपंच संजयआबा सातव, रोटमलनाथ ज्येष्ठ नागरिक संघातील कार्यकारिणीतील सदस्य यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र कार्यवाह डॉ. गणेश चौधरी, प्रा. भरत कानगुडे, डॉ. संतोष वाढवणकर, प्रा. दीप सातव, प्रा. गणेश डोके यांनी काम पाहिले. यावेळी डॉ. विजय बालघरे, डॉ. श्रीकांत देशमुख उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक श्री. रमेश गिरमकर, श्री. निलेश ठोंबरे, श्री. विशाल मोकाटे, श्री. मंगेश गोळे, अक्षय शिंदे, श्री. हनुमंत आटळे, श्रीम. दिपाली पवळे, श्रीम. आम्रपाली डोळस, श्री. गुढेकर, श्री. सुकळकर डी. के. आदींनी सहकार्य केले. शिबिरासाठी लवळे गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.