छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिस भरती प्रक्रिया सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय येथे लोहमार्ग पोलिस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला. सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे वय २३ हा तरुण भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता. रनिंग सुरू असताना अचानक तो मैदानात कोसळला. शहरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. लोहमार्ग पोलिस पदासाठी शारीरिक चाचणी घेत असताना २३ वर्षीय उमेदवार अचानक कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भरतीस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे (वय २३, मूळ रा. सांगली) असे आहे. आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. उपस्थित अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, संग्रामच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सरावादरम्यान अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या आणखी एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सुशांत संतोष भोजने (वय २०, रा. वरुडी) हा गेल्या काही महिन्यांपासून भरतीसाठी नियमित सराव करत होता. पहाटे धावण्याच्या सरावासाठी बाहेर पडलेल्या सुशांतचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नंतर रस्त्याच्या कडेला आढळून आला.या दोन्ही घटनांमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण असून, संबंधित प्रकरणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.