मुंबई – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर अभियान स्वरूपात राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यात विशेष अभियान सुरू करण्याबाबत मोहिमांना गती देण्यात आली आहे. मंत्री श्री. आबिटकर यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम अभियान स्वरुपात राबविण्यात येत असून त्यामध्ये आतापर्यंत उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान : याअंतर्गत १५ जानेवारी २०२६ पासून २१ जिल्ह्यांत ० ते ४० वयोगटातील ४०,०५,७५० नागरिकांची तपासणी, १,०६३ रुग्ण व १७,६७९ वाहक निदर्शनास वाहक आढळून आले आहेत. संशयित रुग्णांसाठी पुढील तपासणी, समुपदेशन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विशेष अभियान दिनांक ८ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दिनांक 8 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 334 हृदय शस्त्रक्रिया व 2,240 इतर शस्त्रक्रिया (हर्निया, क्लेफ्ट लिप इ.) पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.
तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांना IV Iron Sucrose देणे : या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था व महानगरपालिका रुग्णालयांमध्ये दिनांक 1 जानेवारी 2026 ते 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत एकूण 4372 तीव्र रक्तक्षय असणाऱ्या गरोदर मातांची तपासणीअंती निश्चिती करुन त्यापैकी 3963 मातांना इंजेक्शन आयर्न सुक्रोज अथवा फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आलेले आहेत. सर्व गरोदर मातांमध्ये रक्तपातळीतील अपेक्षित वाढ होईपर्यंत आवश्यक तपासण्या व पाठपुरावा देखील करण्यात येत आहे.
हत्तीरोग शस्त्रक्रिया : हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील एकूण १७६५ अंडवृद्धी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असून ९९३ पात्र रुग्णांपैकी एकूण ६०८ रुग्णांवर अंडवृद्धी शस्त्रक्रिया जानेवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सन 2026 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात 289 पात्र रुग्णांपैकी एकूण 210 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत व चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 170 पात्र रुग्णांपैकी 130 रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.
हिवताप मुक्त गडचिरोली अभियान : या अंतर्गत उच्च जोखीम PHC चे दैनंदिन मॉनिटरिंग, LLIN वितरण, IRS फवारणी, तज्ज्ञ समितीमार्फत नियमित आढावा घेण्यात येतो. ‘मलेरिया मुक्त गडचिरोली’ अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाकडून हायरिस्क भागांमध्ये दररोज मॉनिटरिंग, मच्छरदाण्यांचे वितरण, जनजागृती, IRS फवारणी व डास नियंत्रण उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रख्यात तज्ज्ञ डॉ.अभय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच Gates Foundation, CHRI-PATH, Clinton Health Access Initiative, FHI 360 आणि TCI सह विविध संस्थांच्या सहकार्याने मलेरियामुक्त गडचिरोलीसाठी समन्वित प्रयत्न सुरू आहेत.
क्षयरुग्णांसाठी फूड बास्केट : क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत उपचाराधीन टीबी रुग्णांना पोषण सहाय्य म्हणून अन्नधान्य किट वितरण मोहिम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून उपचार यशस्वी होण्यास मदत होत आहे. राज्यस्तरीय आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ३६,५०७ निक्षय मित्र नोंदणीकृत असून १,५७,१७३ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी १,०९,१७४ रुग्णांनी अन्नधान्य किटसाठी संमती दिली असून, मोहिमेदरम्यान २२,२०१ रुग्णांना प्रत्यक्ष किटचे वितरण करण्यात आले आहे. सामाजिक सहभागाच्या बळावर क्षयरोगमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठरत आहे.
कुष्ठरोग प्रतिबंध (PEP) : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार साध्य करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष पीईपी मोहीम राबविण्यात येत आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या निकट सहवासितांना सिंगल डोस रिफॅम्पिसिन (SDR) देण्यात येत आहे. आतापर्यंत १६,७६१ रुग्णांची नोंद झाली असून ४,४७,२९६ सहवासितांपैकी ३,२५,४६० लाखांहून अधिक व्यक्तींना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहेत. एकही सहवासीत पीईपीपासून वंचित राहू नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ३० वर्षांवरील नागरिकांसाठी उच्च रक्तदाब व मधुमेह या आजारांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर, NCD क्लिनिक व इतर आरोग्य संस्थांमार्फत लोकसंख्या आधारित तपासणी (PBS) केली जात असून आशा व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन जनजागृती व समुपदेशन करत आहेत.
आतापर्यंत झालेल्या तपासण्या : १ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत एकूण ९,४१,६७४ नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी करण्यात आली असून यापैकी ६२,६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ८,५०,८५७ नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी झाली असून यामध्ये ३६,३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन्ही आजार असलेले २१,९६७ रुग्ण आढळले, ज्यापैकी २०,७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या मोहिमेद्वारे नागरिकांचे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि नियमित पाठपुरावा सुनिश्चित करून त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे.
नागरिकांनी वेळेत तपासणी करून घ्यावी, नियमित उपचार घ्यावेत आणि विविध आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करुन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शासन गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.