बारामती: अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन येथे निवेदन दिल्यानंतर आता बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
आज बारामती पोलीस स्टेशनसमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि पवार कुटुंबीय एकत्र जमले. "एफआयआर घेतलीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. “जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता,” असे लिहिलेले फलक हातात घेऊन समर्थकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
“अनेक शक्ती गुन्हा नोंदवू देत नाहीत” – समर्थकांचा आरोप
या वेळी राजेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नागरिकांना घटनेबाबत स्पष्ट आणि संपूर्ण माहिती मिळत नसल्यामुळे शंका वाढत आहेत. पारदर्शक तपास आणि अधिकृत अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली.समर्थकांनी आरोप केला की, काही शक्ती गुन्हा दाखल होऊ देत नाहीत. ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा आणि इतर बाबी संशयास्पद वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. संपूर्ण अहवाल जाहीर करून जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कंपनीवर कारवाईची मागणी
पोलीस ठाण्यात आलेल्या युगेंद्र पवार यांनी संबंधित व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची ठाम भूमिका मांडली. “दादांना न्याय मिळावा आणि प्रकरणाची जलद व निष्पक्ष चौकशी व्हावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अहवालात (Directorate General of Civil Aviation) मेंटेनन्समधील कथित त्रुटी आणि क्रिमिनल नेग्लिजन्सचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर अशा प्रकारचा निष्कर्ष नोंदवला असेल, तर संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.बारामती पोलिसांकडून योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.