सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 क्राईम

हुंड्याच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरच्या पत्नीची आत्महत्या; लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत दुर्दैवी अंत

डिजिटल पुणे    28-02-2026 13:08:40

पुणे, बाणेर : पुण्यात हुंड्यासाठी होत असलेल्या कथित मानसिक छळामुळे नवविवाहितेने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साखरपुड्यावेळी “तुम्ही फक्त कन्यादान करा, आम्हाला काहीही नको,” असे आश्वासन देणाऱ्या पती व सासरच्यांकडून लग्नानंतर विविध मागण्या आणि मानसिक त्रास सुरू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संबंधित विवाहितेने राहत्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. अंत्यसंस्कारानंतर २६ फेब्रुवारीला बाणेर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मृत तरुणीचे नाव गंगा तेजस बेंबळकर (वय २७) असे असून ती बाणेर परिसरातील पिओनी सोसायटी, योगी पार्क येथे राहत होती. तिचे वडील शरणकुमार माशाळ (वय ५९, रा. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती तेजस बेंबळकर (वय ३१) तसेच सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती उच्चशिक्षित असून आयटी क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती आहे.

फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात मुलगा व त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही अपेक्षा नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, साखरपुड्यानंतर देण्यात आलेल्या आहेरांवरून नाराजी व्यक्त करत मुलीच्या कुटुंबाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे. “आमचे पाहुणे उच्चभ्रू आहेत,” असे सांगत लग्नाची व्यवस्था अधिक भव्य स्वरूपात करण्याचा दबाव टाकण्यात आला होता, असे तक्रारीत नमूद आहे.

लग्नासाठी महागडे मंगल कार्यालय आणि हॉटेल बुक करण्याची अट घालण्यात आल्याचेही फिर्यादींनी म्हटले आहे. मुलीच्या वडिलांनी प्लॉट विकून सुमारे १ लाख ८० हजार रुपये खर्च करून मंगल कार्यालय आरक्षित केले. तरीही लग्नस्थळाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आणि पाहुण्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी लागल्याचे सांगण्यात आले आहे.

लग्नानंतर काही दिवसांतच विवाहितेने वडिलांना हुंड्यासाठी मानसिक छळ होत असल्याचे सांगितले होते. नंतर एका कौटुंबिक कार्यक्रमात भेटीतही तिने त्रासाबाबत बोलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच, तिने मैत्रिणीलाही फोनवरून होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी रात्री तिने राहत्या इमारतीवरून उडी घेतल्याची घटना घडली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हुंडाबळी किंवा कौटुंबिक छळासंबंधी कोणतीही माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.


 Give Feedback



 जाहिराती