सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 जिल्हा

सर्वसमावेशकतेमुळे मराठी भाषा समृद्ध – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

डिजिटल पुणे    28-02-2026 14:52:47

मुंबई : “मराठी भाषा प्रगल्भ, समृद्ध आणि सर्वसमावेशक आहे. इतर भाषांतील  विचार, साहित्य आणि अभिव्यक्ती आपल्या भाषेत सामावून घेतल्याने भाषा अधिकाधिक समृद्ध होत असते. या देवाणघेवाणीमुळे सांस्कृतिक विश्व अधिक विस्तारते, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे आयोजित ‘वर्ड इन ब्लूम’ या सांस्कृतिक उत्सवातील ‘लिखाई’ या विशेष कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड शेलार बोलत होते. कार्यक्रमास  गीतकार व पटकथाकार पद्मश्री जावेद अख्तर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, ‘एनसीपीए’चे श्रीहर्ष केणी, संयोजक श्रीमती सुजाता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त होत असलेले असे साहित्यिक उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. राज्य शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. मराठी साहित्यात दिग्गज कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या लेखनातून मानवी संवेदनांचे सूक्ष्म दर्शन घडते. त्यांच्या साहित्याने मराठी मनाची अस्मिता आणि स्वाभिमान जागृत केला. ‘लिखाई’सारख्या उपक्रमांमुळे नव्या पिढीसमोर साहित्याचे व्यापक वर्तुळ उलगडत असून विविध भाषांतील सर्जनशीलतेचा संगम घडत आहे.

यावेळी हिंदी, उर्दू, मराठीसह विविध भाषांतील कवी अरुण बवानी, शकील पारसी, उदयन ठक्कर आणि श्री चंद्रशेखर यांचा सन्मान करण्यात आला. ‘एनसीपीए’च्या वतीने सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. शेलार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.पद्मश्री जावेद अख्तर यांनी आपल्या भाषणात गझल आणि काव्यनिर्मितीतील सहजता, सौंदर्य आणि विचारांची ताकद यावर प्रकाश टाकला. साहित्य आणि भाषा या काळानुरूप विकसित होत राहतात; परस्पर संवाद, भाषांतर आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून त्या अधिक व्यापक होत जातात, असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात साहित्य, भाषा आणि सांस्कृतिक  संवाद यांचा सुरेख संगम रसिकांना अनुभवायला मिळाला.


 Give Feedback



 जाहिराती