बारामती : अजित पवार यांच्या अपघाताबाबत सत्य समोर येईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी “प्रश्न विचारणे म्हणजे चमकोगिरी नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.मिटकरी म्हणाले, “जर रोहित पवार अपघाताबाबत प्रश्न विचारत असतील आणि ते काहींना चमकोगिरी वाटत असेल, तर मग मीही तेच प्रश्न विचारून चमकोगिरी करतो आहे का? ज्या घरातील एक व्यक्ती गमावली आहे, तो असा स्टंट का करेल?” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिला.
“अजित पवार आमच्यात नाहीत, ही वेदना कायम”
अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्याचा उल्लेख करत मिटकरी भावुक झाले. “अधिवेशनाच्या काळात एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा त्यांची आठवण आली नाही. अजूनही वाटतं ते सभागृहात येतील, आमच्याशी चर्चा करतील. पण आता ते आपल्यात नाहीत, ही खंत कायम राहील,” असे त्यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या प्रश्नांना पाठिंबा
राजकीय मतभेद वेगळे असले तरी अपघाताबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर आपण रोहित पवार यांच्या सोबत आहोत, असेही मिटकरी म्हणाले. “माझ्याही जवळचा माणूस गेला आहे. त्यामुळे सत्य बाहेर यावे, यासाठी प्रश्न विचारणे चुकीचे नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“तुम्ही जास्त का बोलता?” – मिटकरींचा सवाल
स्वतःच्या पक्षातील काही नेतेच “तुम्ही का जास्त बोलता?” असा सवाल करत असल्याचे सांगत मिटकरी म्हणाले, “मला जे योग्य वाटते ते मी करतो. काही आमदार माझ्यासोबत आहेत, बाकी का नाहीत हे मी सांगू शकत नाही.”
सुनिता पवारां विषयी सकारात्मक प्रतिक्रिया
दरम्यान, सुनेत्रा पवार यांना संधी दिल्यास त्या अजित पवारांची पोकळी भरून काढू शकतील आणि सक्षम नेतृत्व उभे करू शकतील, असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला.